ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर

२० व्या शतकातील थोर संत. ज्ञान, भक्तिमार्ग आणि शक्तिपात मार्गातील अधिकारी व्यक्तिमत्व.

न्यायचुडामणी
विद्यावाचस्पती
महामहोपाध्याय
राष्ट्रीय पंडित
भागवताचार्य

भारतवर्षामध्ये अनादी कालापासून उच्चकोटीच्या संतांची परंपरा सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे अनेक थोर संत या देशात होऊन गेले. दत्त संप्रदायात परमपूज्य टेम्बेस्वामी महाराज यांनी देशभर पायी भ्रमण करीत या संप्रदायाचा मोठा विस्तार करीत सामान्य माणसांची दुःख दूर करण्यासाठी’ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या महामंत्राची निर्मिती केली आणि भक्ती, ज्ञान आणि योग याचा प्रसार केला. तीच परंपरा पुढे परमपूज्य योगीराज श्रीगुळवणी महाराजांनी चालवली त्यानंतर प. पू. ब्रह्मश्री दत्तमहाराज कवीश्वर यांनी समर्थपणे चालवली. आता जालना येथील दत्ताश्रमाची निर्मिती करीत येथून प. पू. भगवतीस्वरूप ताईमहाराज ही परंपरा चालवत आहेत. परमपूज्य दत्तमहाराज हे वेदांत शास्त्रातील फार मोठे अधिकारी सतपुरुष होऊन गेले. त्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र तरुण पिढीला माहित व्हावे हा या वेबसाईटचा हेतू आहे.

जीवनदर्शन

ब्रह्मश्री प. पू. श्री दत्तात्रेय धुंडिराज कवीश्वर यांचे मूळ घराणे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मांडवगडचे. पुढे श्रीमहाराजांचे आजोबा प.पू.श्री वक्रतुंडमहाराज व पिताजी प. पू. श्री धुंडिराज महाराजाचे श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे दीर्घ काळ वास्तव्य झाल्याने श्रीमहाराजांचा जन्म वाडी येथे २ मार्च १९१० रोजी झाला. श्रीमहाराजांचे बालपणही वाडीतच गेले. परंपरागत पध्दतीने त्यांचे शिक्षण झाले. वेद, वेदांत, धर्मशास्त्र, काव्य, न्यायशास्त्रासारख्या गहन विषयांचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. त्याच्या जोडीला श्रीगणेश व श्रीदत्तात्रेयांची अखंड उपासना त्यांनी केली. श्री दत्तमहाराजांच्या मातोश्रीही अत्यंत पतिनिष्ठ, धर्माचरणी, दैवीगुणसंपन्न होत्या. या दोघांना प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराजांचे कृपाछत्र लाभले होते. त्यांच्या आज्ञेप्रमाणेच पुत्रप्राप्तीसाठी जे या उभयतांनी जपजाप्य, यज्ञयागादि अनुष्ठान केले त्याचा प्रसाद म्हणून श्रीदत्तमहाराजांचा जन्म झाला.

चरित्रमाला

ब्रह्मश्री दत्तमहाराजांचे आजोबा प. पू. श्रीवक्रतुंड महाराज आणि वडील प. पू. श्रीधुंडिराज महाराज दोघेही अधिकारी सत्पुरुष होते. प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजाचे कृपाछत्र कवीश्वर घराण्यावर होते. प. पू. श्रीदत्तमहाराज यांचा जन्म झाल्यावर त्यांना मांडीवर घेवून स्वामी महाराजांनी सांगितले की या ‘बालकाच्या रुपात आजोबांनीच म्हणजे प. पू. श्रीवक्रतुंड महाराजांनी पुन्हा जन्म घेतला आहे.’  पुढे प. प. श्रीस्वामीमहाराजांचे शिष्योत्तम योगीराज श्रीगुळवणी महाराजांची कृपा श्रीदत्तमहाराजांना लाभली आणि त्यांचा वरदहस्त श्रीदत्तमहाराजांवर, त्यांच्या कुटुंबावर आजीवन होता. श्रीदत्तमहाराजांचे जीवन साकारणाऱ्या या सत्पुरुषांची संक्षिप्त चरित्रे आणि काही विस्तृत चरित्रे डाउनलोड करण्यास खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत.

चरित्रमाला

दिव्यत्वाची अनुभूती

श्री महाराजांविषयीची एखादी साधीशी आठवण असो अथवा एखादा अनुभव, त्यातून त्यांचे विशाल व्यक्तिमत्व आपल्यासमोर विविध रूपांमध्ये येतं. भक्तांनी स्मृतींमध्ये जपून ठेवलेल्या अशा आठवणींचा हा संग्रह आहे. महाराजांचे दिव्यत्व आपल्या सर्वांच्या जीवनात प्रकटावे याकरिता हा छोटासा उपक्रम. अनंत ईश्वराला सांत आठवणीत बांधण्याचा हा प्रेमाचा प्रयत्न. 

संदर्भ ग्रंथ

अधिकारी सत्पुरुष आणि संतमहात्म्यांनी रचलेले ग्रंथ आणि त्यावर केलेले निरूपण, त्यांची चरित्रे ही केवळ छापील पाने नसतात तर अशा माहात्म्यांचा शब्दरूपी प्रत्यक्ष सहवास असतो. अध्यात्मिक मार्गावरील वाटचालीमध्ये असे ग्रंथ दीपस्तंभाचे कार्य करतात. अशाच विविध ग्रंथांचा संग्रह डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.   

प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ग्रंथ

प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांच्या उपलब्ध सर्व वाङ्मयाचे प्रकाशनकार्य योगीराज श्रीगुळवणीमहाराज यांनी प. पू. ब्रह्मश्री विद्यावाचस्पति श्रीदत्तमहाराज कवीश्वर आणि इतर स्वामिभक्तांच्या सहकार्याने संपन्न केले. स्वामीमहाराजांची ही ग्रंथसंपदा डाउनलोड करण्यास उपलब्ध आहे  

भक्तांसाठी आवाहन

ब्रह्मश्री दत्तमहाराजांना समर्पित असलेली ही वेबसाईट अधिक परिपूर्ण करणे हे मोठा आवाका असलेले दीर्घकालीन कार्य आहे. आपल्याकडे श्रीमहाराजांचे फोटोज, व्हिडीओज, पत्रे असतील तसेच आपले काही अनुभव असतील तर ते ही इथे प्रसिद्ध करता येतील. आपण या कार्यात आपले योगदान या पद्धतीने देण्यास इच्छुक असाल तर आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती.