चार पांच पिढ्यांपासून वैदिक प्राच्य संस्कृत विद्या, श्रौतस्मार्त यागानुष्ठान, मंत्र तंत्र शास्त्र, महाभारत, भागवत इत्यादिंवर प्रभुत्व असलेल्या, ईशसेवेत रममाण होणाऱ्या व ईश्वरी कृपा असलेल्या पवित्र, ज्ञानी व थोर शास्त्री घराण्यात श्री धुंडिराज महाराजांचा जन्म झाला. श्रीमहाराजांचे प्राथमिक शिक्षण वाडीत वडिलांजवळ आणि परंपरागत शिक्षण वाडीच्याच श्रीकृष्णाशास्त्री वष्ट यांच्या पाठशाळेत झाले. पुढचे शिक्षण घेण्याकरता ते इंदोरला जाऊन राहिले होते. वेद वेदांत, धर्म शास्त्र, काव्यालंकार, आणि न्यायशास्त्राचे त्यांनी उत्तम अध्ययन व पुढे अध्यापन केले. त्यांनी आयुष्यभर श्रीगणेशाची, श्रीदत्तप्रभुंची व कुलस्वामीनी श्री रेणुकामातेची उपासना केली. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनाही बालपणापासून प प श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचा सहवास लाभला आणि आपल्या दैवीगुणसंपदेने ते महाराजांच्या पूर्ण कृपेला पात्र ठरले. सहाजिकच श्रीस्वामीमहाराजांचे अधिकारी शिष्य प पू श्रीगुळवणी महाराज व प पू श्रीदीक्षित स्वामीमहाराज यांच्याशीही त्यांचा निकटचा संबंध आला. या दोघांचेही वाडीवर प्रेम होते. श्रीदीक्षित स्वामीमहाराज तर बराच काळ वाडीतच राहात असत पुढे ते नदी पलिकडच्या श्रीक्षेत्र अमरेश्वर येथे राहाण्यास गेले.
ईश्वरी अनुग्रह, ईशसेवा तप, अध्यात्मिक ज्ञान, ज्ञातेपणा न मिरवणारी लीनता, निरभिमान, निरपेक्षता, निर्लोभता, मौन, आर्जव, विनय, शुचिता, दया, वगैरे सर्व गुणसंपदा श्री महाराजांच्या ठिकाणी पहायला मिळत होती. श्रीस्वामीमहाराजांच्या आज्ञेने त्यांनी वाडीत वेदपाठशाळा सुरु केली होती. वाडीतील मुलांना उपनयनानंतर इथे वेदाध्यनाकरता पाठवले जाई. एकीकडे आपल्या उपास्य दैवताची उपासना बालपणापासूनच सुरु व्हावी व दुसरीकडे त्यांना संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास सुलभरीत्या करता यावा म्हणून श्रीस्वामीमहाराजांनी मुददाम “त्रिशतीकाव्य” या वेदपाठशाळेकरता पाठ्य पुस्तक म्हणून लिहून दिले.
त्यांच्याजवळ एक छोटी श्रीदत्तूबाळाची म्हणजे श्रीदत्तात्रेयांची बाल स्वरुपातील मूर्ती असे (जी सध्या श्रीदत्तमहाराजांच्या देव पूजेत आहे). त्या मूर्तीचा ते बाळ म्हणूनच सांभाळ करीत, कोणाला अनुग्रह देताना दत्तूबाळाला जवळ ठेवून त्याच्या आज्ञेने ते मंत्र देत. थंडीच्या दिवसात त्याला स्वेटर घालतात, त्याचे स्वतंत्र दागिनेही केलेले आहेत. श्री धुंडिराजमहाराजांनी श्रीस्वामीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे धर्मसिंधूत दिलेला जप विधिपूर्वक करून होम हवनाने त्याची सांगता केली. वाडवडिलांची पुण्याई, धुंडिराजमहाराज व त्यांच्या पत्नीची श्रद्धा, भक्ती, तपश्चर्या आणि श्रीस्वामीमहाराजांच्या कृपाप्रसादाने इ स १९१० माघ वद्य ६ ला श्रीदत्तमहाराजांचा जन्म झाला.
श्री धुंडिराज महाराजांना श्री स्वामीमहाराजांचा धारवाडला मुक्काम असताना स्वतः स्वैपाक करुन श्री स्वामीमहाराजांना भिक्षा केली. श्रीस्वामीमहाराज गरुडेश्वर येथे स्थिरावल्यावर श्री धुंडिराजमहाराज छोट्या दत्तमहाराजांना घेऊन गरुडेश्वरला दर्शनाला गेले होते. त्यावेळी त्यांना श्रीस्वामीमहाराजांनी मोठया प्रेमाने बरेच दिवस ठेवून घेतले. श्रीक्षेत्र नरसोबा वाडीतील प्रदीर्घ वास्तव्यानंतर वृद्धापकाळात श्रीमहाराज विदर्भातील देऊळगांवराजा येथे राहाण्यास आले. तिथे त्यांनी श्रीबालाजीमहाराजांची अखंड सेवा केली. ते पंरपरागत पुराण सांगत, प्रसंगाने प्रवचन करीत. विदर्भ, मराठवाडा वगैरे भागात यांचे हजारो शिष्य झाले. भक्तांच्याबद्दलचा त्यांचा लळा व जिव्हाळा विलक्षण होता. त्यांच्याकडे समाजातील सर्व स्तरातील दुःखी, पीडीत लोक सतत येत आणि महाराजांनी सांगितलेल्या साध्या सोप्या उपायांनी दुःखमुक्त होत. या निमित्ताने ते लोकांना ईशभक्तीकडे वळवत. मंत्रशास्त्रज्ञ असल्याने दैवी संकटावर ते अचूक पण साधे सोपे उपाय सांगत. सर्वांना ज्ञान, उपदेश, मार्गदर्शन व संकट निवारण करुन महाराजांनी असंख्य जीवांना उपकृत केले. त्यांच्या ईश शक्तीचे व दैवी सामर्थ्याचे त्यांच्या भक्तांना आजही अनुभव येतात. अखंड ईश्वर चिंतन, भक्ती करीत असल्याने आत्मज्ञान संपन्न व साक्षात्कारी असूनही त्यांच्या लीनता, विनम्रता, निगर्वी सरळ स्वभावामुळे त्यांच्याकडे आलेली व्यक्ती फार प्रभावित होत असे. श्री धुंडिराजमहाराजांच्या पत्नी सौ सरस्वतीबाईही धार्मिक आचरण व पूजा अर्चा, व्रत वैकल्ये, निरनिराळी अनुष्ठाने अखंड करीत असत. त्या श्रीमहाराजांच्या कार्यात पूर्णपणे समरस झाल्या होत्या. यांनी विदर्भातील सुलतानपूर येथे देह ठेवला. त्यांचे तिथे समाधी मंदिर बांधले आहे.
प. पू. श्रीधुंडिराजमहाराज कवीश्वर यांचे विस्तृत चरित्र डाउनलोड करा