प पू श्री नागेश भटजी गुळवणी हे घराण्यातील सर्व दृष्टीने थोर पुरुष, भगवत् भक्त प प श्रीनारायणस्वामीमहाराज हे गुळवणी घराण्याचे कुलगुरु. यांची कृपा गुळवणी घराण्यावर होती. गुळवणी घराणे दत्तभक्त. यांच्या कृपेने श्री नागेश भटजींना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या मुलाचे नांव नारायण असे ठेवले. नारायण अत्यंत सात्विक, आचारसंपन्न होते. यांना चार मुलगे व तीन मुली झाल्या. यांचे जेष्ठ पुत्र दत्तात्रेय हे गुरुमहाराजांचे पिताजी.
गुरुमहाराजांच्या आईची – मातोश्रीची इच्छा होती की आपल्याला नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांकडून प्रसाद पादुका मिळाव्यात. त्याकरता उमाबाईंनी उपोषण सुरु केले. त्यांना दिवस गेले होते व दुसरीकडे पादुका प्रसादाची तळमळ वाढत होती. त्यांच्या मनाची ही ओढ दत्तप्रभुंना समजली आणि एकदा ध्यानाला बसल्या असताना अष्टगंधयुक्त चांदीच्या पादुका त्यांच्या ओटीत पडल्या. एक संन्यासी एकदम समोरुन अदृष्य झाल्यासारखे दिसले. आणखी एक शुभ शकून झाला दत्तंभटजी देवावर पाणी घालत असताना शब्द ऐकू आले “मी तुझ्यावर प्रसन्न आहे” अशा रीतीने दत्तप्रभुंच्या कृपेने आणि मातापित्यांच्या पुण्याईने गुरुमहाराजांचा जन्म झाला.
इ स १९०७ च्या श्रीगुरुव्दादशीला वाडीत वयाच्या २१ व्या वर्षी गुरुमहाराजांना थोरल्या महाराजांचे म्हणजेच प प श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे दर्शन झाले. गुरुमहाराजांचे थोरले बंधू शंकरशास्त्री वाडीला आले होते त्यांची व थोरल्या महाराजांची भेट झाली होती. त्यांनी महाराजांना विचारले, “वामन कोल्हापूरला आहे, त्याला दर्शनाला बोलावू का?” महाराजांनी परवानगी देऊन सांगितले की येताना श्रीदत्ताची प्रतिमा काढून त्यामध्ये गळयात श्लोकबद्ध हार घातल्याचे दाखव. कोणता श्लोक हारात लिहायचा तेही सांगितले. तो श्लोक त्रिशतीकाव्यातला आहे. गुरुमहाराजांनी सर्व सूचना लक्षात घेतल्या वर ते अंतर्मुख झाले आणि त्यांना आपल्या हृदयाकाशात एकमुखी दत्तात्रेयांचे दर्शन झाले. गुरुमहाराजांनी जसे दर्शन झाले तसे चित्र काढून ते श्लोकयुक्त हारबद्ध केले. आणि ते चित्र घेऊन गुरुमहाराज वाडीला आले. थोरल्या महाराजांना अत्यंत भक्तीभावाने वंदन करून ते चित्र पुढे ठेवले. स्वामींनी चित्र हाता घेऊन नीट पाहिले. ते निर्दोष झालेले पाहून त्यांना अत्यंत समाधान वाटले. या सेवेचे फळ म्हणून त्यांनी कोणतीही बाधा होऊ नये म्हणून गुरुमहाराजांच्या हातात सतत बांधण्याकरता एक मंत्र यंत्रात बंदिस्त करुन चांदीच्या पेटीत आणि ती पेटी स्वहस्ते महाराजांच्या हाताला बांधली. या यंत्रामुळे संपूर्ण आयुष्यात गुरुमहाराज कोणत्याही मायेत सांपडले नाहीत. या प्रसंगाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवण्याकरता गुरुमहाराजांनी गुरुव्दादशीला वाडीची वारी सुरु केली.
१९०९ साली वडिलांच्या वियोगानंतर शंकरशास्त्रीना स्वामीमहाराजांच्या दर्शनाची फार ओढ लागली आणि स्वामीमहाराज पवनीला आहेत समजल्यावर ते तिकडे गेले. स्वामीमहारजांचे दर्शन भेट झाल्यावर त्यांच्या आज्ञेने घरी पत्र पाठवून त्यांनी आई, बहिण व गुरुमहाराजांना पवनीला बोलावून घेतले. आजेगांवहून शंकरकाकाही आले होते. गुरुमहाराजांचा आणि शंकरकाकांचा इथे प्रथम परिचय झाला. इथेच गांडामहाराज, सीताराममहाराज, गोविंदराव पंडितांचाही परिचय झाला. इथल्या चातुर्मासात स्वामीमहाराजांनी गुरुमहाराज व त्यांच्या कुटुंबीयांना मंत्रदीक्षा दिली. पवनीच्या मुक्कामात स्वामीमहाराजांच्या कृपेने उदंड अन्नदान झाले. ते स्वतः मात्र रोज भिक्षा मागून आणत असत. शेवटच्या दिवशी सर्वांना अमाप वस्त्रदान झाले.
पवनीहून परतल्यावर गुरुमहाराज नोकरीच्या शोधात मुंबईल आले पण त्यांच्या मनासारखी नोकरी मिळाली नाही. मग उगीच व्यर्थ काळ दवडण्यापेक्षा कांही पुण्यकर्म करण्याच्या हेतुने ते गाणगापूरला आले आणि श्रीगुरुचरित्राचे सात सप्ताह करायचे ठरवले. सातवा सप्ताह आटोपल्यावर पुन्हा स्वामीमहाराजांच्या शोधार्थ निघाले. स्वामीमहाराजांचा सतत संचार चालू असल्याने ते कुठे असतील हे समजायला कठिण होते तरी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुमहाराज सीतामनी, मदिहाळ, गदग, धारवाड वगैरे ठिकाणी शोध घेत हावनूरला येऊन पोहोचले. आणि सर्व श्रमाचे सार्थक होऊन स्वामीमहाराजांचे दर्शन झाले. त्यांचा तिथे चातुर्मास होणार होता व त्यांनी गुरुमहाराजांना त्यांच्या सहवासात राहाण्याची अनुमती दिली. या मुक्कामात स्वामीमहाराजांनी गुरुमहाराजांना आसने करुन दाखवली, प्राणायाम शिकवला, गीतेची आणि विष्णुसहस्त्रनामाची संथा दिली, अजपाजपाचा संकल्प सांगून लिहून दिला, नित्योपासना काय करायची ते समजावले. वडिलांचे श्राद्ध असल्याने गुरुमहाराजांना स्वामींचा सहवास सोडून कुडुचीला परतावे लागले. निरोप घेताना गुरुमहाराजांनी स्वामींना “आता पुन्हा दर्शन कधी?” असे विचारल्यावर स्वामींनी स्वतःकडे बोट दाखवून म्हणाले “हे असे लक्षात ठेव म्हणजे झाले”. त्यानंतर पुन्हा श्रीस्वामीमहाराजांची भेट १९११ साली मराठवाड्यातील पिंपरी येथे झाली. तिथून श्रीस्वामीमहाराजांच्याबरोबर औंढ्या नागनाथला येताना गुरुमहाराजांनी कांही अवघड आसने करुन दाखवली. स्वामीमहाराजांनी प्रसन्न होऊन सिद्धासन व पश्चिमोत्तासनाचा अभ्यास वाढवण्यास सांगितला. पुढील वर्षी स्वामीमहाराजांच्या आशीर्वादाने औदुंबर येथे श्रीदत्तमालामंचाचे अनुष्ठान निर्विघ्नपणे पार पडले. आणि नंतर गुरुमहाराज गरुडेश्वरला गेले. इथे त्यांना स्वामीमहाराजांची अनेक प्रकारे सेवा करायची संधि मिळाली. स्वामीमहाराजांची दांत घासायची, स्नानाची, पर्णकुटी झाडून स्वच्छ करणे, स्वामीमहाराज सांगतील त्याप्रमाणे पत्र लेखन करणे, आलेली पत्रे वाचून दाखवणे अशी विविध सेवा घडली. स्वामीमहाराजांनी गुरुमहाराजांना धौती शिकवली. ही त्यांची शेवटचीच भेट ठरली कारण ते घरी आल्यानंतर लवकरच (१९१४) स्वामीमहाराजांनी अवतार समाप्ती केली.
इ स १९१४ ते १९१७ पर्यंत लौकिक इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. चित्रकलेची अभिजात आवड आवडीने वाढवली. मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून ते चित्रकलेची परिक्षा उत्तीर्ण झाले. फोटोग्राफीमध्ये प्राविण्य मिळवले आणि बार्शीच्या हायस्कुलात चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी धरली. त्यांना अमेरिकेला जायची संधि अनायासे चालून आली पण ते अमेरिकेला गेले नाहीत. योगमार्गातच पुढे प्रगती करायची तळमळ वाढत गेली आणि ईशेच्छेने त्यांची होशंगाबादमध्ये १९२२ साली प प श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांची भेट झाली. गुरुमहाराजांना हवी असलेली शक्तीपात दीक्षा हे देतात असे त्यांना समजल्याने त्यांना अतिशय आनंद झाला. त्यावेळी गुरुमहाराजांबरोबर सर्वश्री शंकरकाका, बाबा महाजन आणि वैद्य मास्तर ही मंडळी होती. इथे एका सुमुहूर्तावर श्रीलोकनाथतीर्थस्वामीमहाराजांनी गुरुमहाराजांना शक्तीपात दीक्षा दिली. बलवत्तर पूर्व संस्कारांमुळे शुद्ध आचरण व त्याचे फळ म्हणून मनःशुद्धी व शरीरशुद्धी यामुळे इतर कोणाहीपेक्षा गुरुमहाराजांवर दीक्षेचा सर्वात जास्त सुपरिणाम दिसू लागल. गुरुमहाराजांची तयारी आणि योग्यता पाहून स्वामीमहाराजांनी त्यांना इतरांनही दीक्षा द्यायचा अधिकार आपणहोऊन दिला. पुढे १९२६ मध्ये गुरुमहाराज बार्शी सोडून कायमच्या वास्तव्याकरता पुण्यात येऊन राहिले. त्यांनी शनिवार पेठेतल्या गोवईकरांच्या चाळीत बिऱ्हाड केले. नूतन मराठी विद्यालयात ड्रॉइंग मास्तर म्हणून नोकरी करु लागले.