विविध भक्तांनी लिहिलेली महाराजांची चरित्रे आणि गौरवग्रंथ डाउनलोड करण्यास याच पेजवर सर्वात खाली उपलब्ध आहेत.
श्री महाराजांचे आजोबा प पू श्री वक्रतुंड महाराज व पिताजी प पू श्रीधुंडिराज महाराजांचे श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे दीर्घ काळ वास्तव्य झाल्याने श्री महाराजांचा जन्म वाडी येथे माघ व 6 शके 1831 (2 मार्च 1910) रोजी झाला. जगन्नियंत्याच्या इच्छेने त्या वेळी प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज वाडीतच होते आणि त्यांनी श्रीमहाराजांच्या घरी येऊन त्यांच्यावर कृपादृष्टी टाकून मंगल आशीर्वाद दिला. आणि त्याचवेळी श्रीमहाराजांची योग्यता सर्वांना सांगितली. श्री महाराजांचे बालपणही वाडीतच गेले. परंपरागत पद्धतीने त्यांचे शिक्षण झाले. वेद, वेदांत, धर्मशास्त्र, काव्य, न्यायशास्त्रासारख्या गहन विषयांचे त्यांना पूर्ण ज्ञान होते.
त्याच्या जोडीला श्रीगणेश व श्री दत्तात्रेयांची अखंड उपासना त्यांनी केली. श्री दत्तमहाराजांच्या मातोश्रीही अत्यंत पतिनिष्ठ, धर्माचरणी, दैवीगुणसंपन्न होत्या. या दोघांना प प श्रीवासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांचे कृपाछत्र लाभले होते. त्यांच्या आज्ञेप्रमाणेच पुत्रप्राप्तीसाठी जे या उभयतांनी जपजाप्य, यज्ञयागादि अनुष्ठान केले त्याचा प्रसाद म्हणून श्रीदत्तमहाराजांचा जन्म झाला.
श्रीदत्तमहाराजांचे बालपण व प्राथमिक शिक्षण वाडीत झाले. प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे प्रिय शिष्य श्री दीक्षितस्वामी महाराजांचा त्यावेळी वाडीत व औरवाड येथे निवास होता. त्यामुळे श्रीदत्तमहाराजांना त्यांचेही मार्गदर्शन व कृपाछत्र लाभले. श्रीदीक्षित स्वामी श्री दत्तमहाराजांचे दीक्षा गुरु होते. श्रीदीक्षित स्वामीमहाराजांनी वाडीतल्या लहान मुलांवर ईशभक्तीचे संस्कार खोलवर रुजवले.
पुढचे शिक्षण श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य जेरेस्वामी महाराजांच्या संस्कृत पाठशाळेत झाले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने कोणताही विषय ते अल्पावधित आत्मसात करीत. ते श्रेष्ठ गुरुभक्त होते. श्रीमहाराजांनी पहिला श्रीमत् भागवत सप्ताह औरवाड येथे वयाच्या 16 व्या वर्षी केला. श्रीदीक्षित स्वामींनी अत्यंत प्रसन्न होऊन त्यांना ’’तुला पूर्ण ज्ञान होऊन तुझे सर्वतोपरि कल्याण होईल’’ असा आशीर्वाद दिला. श्रीमहाराजांचे वाडीवर अत्यंत प्रेम होते. आपले उर्वरित जीवन श्रीदीक्षित स्वामीमहाराजांच्या सेवेत जावे असा त्यांना ध्यास होता. 1986 मध्ये श्रीवामन निवास पूर्ण झाल्यावर त्यांची श्रीदीक्षितस्वामीमहाराजांच्या आज्ञा पत्राप्रमाणे औरवाडला जाऊन कायमचे वास्तव्य करायची तीव्र इच्छा होती व त्यांनी ती अनेकांजवळ बोलूनही दाखवली होती. त्या संदर्भात त्यांनी एकदा गुरुद्वादशी उत्सवाच्या काळात मुंबईच्या कांही भक्त मंडळींजवळ बोलताना असे म्हटले होते, ‘‘पिताजी म्हणत असत, मोठ्या विस्ताराच्या वृक्षावर पक्षी राहतात. पहाटे ते चारा पाण्याकरता उडून जातात पण संध्याकाळी न चुकता परत त्याच वृक्षावर येऊन राहतात तसे हे स्थान आहे. नोकरीच्या निमित्ताने कुठेही राहावे लागले तरी शेवटी इथे येऊन राहायचे आहे.’’
1989 सालपर्यंत ते न चुकता दर वर्षी वाडीला एकदा श्रीनारायणस्वामीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि गुरुद्वादशीच्या निमित्ताने जाऊन 8-10 दिवस राहात असत. तिथे ते परंपरागत पुराण सेवा करीत.
श्रीमहाराजांचा व्याकरणादि विषयांचा अभ्यास सांगलीच्या श्री अभ्यंकरशास्त्रींकडे व पुढील सर्व शास्त्रांचे अध्ययन धारवाडच्या श्री नागेशशास्त्री उप्पेनबेट्टीगेरींकडे झाले. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून शृंगेरीच्या आचार्यांनी ’’आपल्या विद्यावंशामध्ये दत्तात्रेयशास्त्री हे प्रदीपके शिष्यरत्न आहे’’ असे प्रशंसोद्गार काढले होते.
तत्कालीन प्रथेप्रमाणे योग्य वयात त्यांचा विवाह होऊन सौ लक्ष्मीआईसाहेबांची त्यांना शेवटपर्यंत उत्तम साथ मिळाल्याने प्रपंचही श्रीसमर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे ’’नेटका’’ उत्तमरीत्या झाला. पुढे पुण्यात आल्यावर मीमांसा विद्यालयातील श्री सुब्बाशास्त्रींजवळ श्रीमहाराजांचे मीमांसाशास्त्राचे अध्ययन झाले.
नंतर त्यांनी निवृत्तीकाळापर्यंत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अध्यापन केले. कोणताही क्लिष्ट विषय सोपा करून सांगण्याची हातोटी होती. त्यांच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की जरी पहिल्यांदा समजावल्यावर त्यांना तो विषय समजला असला तरी ते महाराजांच्या शिकवणुकीची गोडी अधिक घेण्यासाठी तो विषय समजला नाही असे सांगत म्हणजे महाराज पुन्हा तो वेगळ्या रीतीने समजावीत. विद्यार्थ्यांना महाराजांच्या समजावण्याचा आनंद मिळे. संस्थेत अध्यापकाला काय सोयी, गैरसोयी आहेत याचा विचार न करता ते विद्यादानासारखे दान नाही या भावनेने सदैव विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाकरता झटत असत. त्या काळात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर घरोघरी फोन नव्हते. अचानक कांही कामानिमित्ताने त्यांना जर दुसर्या दिवशी त्यांचा तास घेता येणे शक्य नसेल तर विद्यार्थ्यांचा वेळ फुकट जाऊ नये म्हणूज आदल्या दिवशी ते स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला तसे सांगत. दुसर्या विद्यार्थ्याने अशी आठवण सांगितली की जरी एकीकडे विद्यार्थ्यांना एखादा विषय समजावत असले तरी दुसरीकडे त्यांचे वेगळे चिंतन चालू असे. अध्यापनाच्याबरोबरच दैनंदिन उपासनेत कधी खंड पडला नाही.
पुढे प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे प्रिय शिष्य प पू श्रीगुळवणीमहाराजांशी पूर्व परिचयामुळे निकटचा संपर्क आला आणि श्रीगुळवणीमहाराजांनी श्री दत्तमहाराजांची योग्यता जाणून आपला उत्तराधिकारी नेमले.
श्रीदत्तमहाराजांचे जीवन विविध प्रकारच्या कार्याने भरलेले आहे. श्रीगुळवणीमहाराजांच्या आज्ञेने त्यांनी 1954 साली प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे समग्र वाङ्मय एकत्रित करून संपादित करून 14 खंडांमध्ये प्रसिद्ध केले. हे अत्यंत कठिण कार्य होते. त्याकरता श्रीमहाराजांनी अथक परिश्रम केले. श्री स्वामीमहाराजांच्या वाङ्मयाची उत्तम जाण असल्यामुळेच श्रीगुळवणीमहाराजांनी श्रीमहाराजांची या कार्याकरता निवड केली होती.
त्यांच्या ठिकाणी भक्तीचा त्रिवेणी संगम पहायला मिळतो. कुलपरंपरेप्रमाणे श्री धुंडिराजमहाराजांचे व पुढे श्रीगुळवणीमहाराजांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भक्तोद्धाराचे अखंड कार्य केलेच पण त्याचबरोबर त्यांची स्वतःचीही शिष्य परंपरा निर्माण झाली.
त्यांच्या विद्वत्तेचा कीर्ती सुगंध फक्त भारतातच नव्हे तर देशोदेशी पसरला होता. त्यामुळे नुसते भारताच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून जिज्ञासू त्यांच्याकडे मार्गदर्शनाकरता येत आणि कृतार्थ होऊन जात.
ज्याप्रमाणे प पू श्रीगुळवणीमहाराजांनी आपल्या गुरूंच्या चिरंतन स्मृतीकरता ‘‘श्रीवासुदेवनिवास‘‘ बांधला त्याचप्रमाणे श्रीदत्तमहाराजांनी श्रीगुळवणीमहाराजांवरच्या गुरुभक्तीचे प्रतीक म्हणून पुण्यात श्रीवामन निवास ही भव्य वास्तू बांधली. 1986 साली श्रीगुळवणीमहाराजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून याचे उद्घाटन झाले. त्याकरता टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर वयाची व स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता अनेक वर्ष त्यांनी गावोगांव श्रीभागवत सप्ताह करून आर्थिक मदत मिळवली. यात धार्मिक कार्यक्रमांच्या जोडीला मुख्यत्वे करून समाजसेवेचा एक भाग म्हणून आरोग्य सेवा लोकांना उपलब्ध करून दिली आहे.
ज्याप्रमाणे पुण्यात श्रीवामन निवास बांधला त्याचप्रमाणे त्यांच्या आशीर्वादाने औरवाड येथील श्रीदत्तअमरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला. शाश्वत निधीची तजवीज होऊन त्याची रीतसर व योग्य पद्धतीने कायमची व्यवस्था लागली. हे त्यांच्या जीवनांतले फार मोठे कार्य आहे.
आदि शंकराचार्यांच्या विचारप्रणालीला अनुसरून त्यांनी शेवटपर्यंत ज्ञानादानाचे कार्य केले. त्याचबरोबर दुःखी आर्त जीवांचे दुःख शास्त्रीय उपाय सांगून दूर केले व त्या निमित्ताने अनेक जीवांना त्यांनी ईशभक्तीकडे प्रवृत्त केले.
श्रीमहाराजांना मिळालेल्या असंख्य पदव्यांपैकी कांही प्रमुख पदव्या व सन्मान :