दिव्यत्वाची अनुभूती

श्री महाराजांविषयीची एखादी साधीशी आठवण असो अथवा एखादा अनुभव, त्यातून त्यांचे विशाल व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतं. विविध प्रसंगी भक्तांनी स्मृतींमध्ये जपून ठेवलेल्या अशा आठवणींचा हा संग्रह आहे. अनंत ईश्वराला सांत आठवणीत बांधण्याचा हा प्रेमाचा प्रयत्न. यातून प्रकट होणारे महाराजांचे दिव्यत्व आपल्या सर्वांच्या जीवनात प्रकटावे याकरिता हा छोटासा उपक्रम. आपल्याही अशा काही स्मृती असतील तर त्या आम्हाला नक्की पाठवा. त्या इथे प्रसिद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

  1. महाराजांच्या भक्तांना वाटायचे त्यांनी रेल्वेने प्रवास करताना फर्स्ट क्लासने किंवा ए सी ने प्रवास करावा. भक्तांच्या भावना तर दुखवायच्या नाहीत आणि उच्च श्रेणीत प्रवासही करायचा नाही हे दोन्ही साधण्याचे त्यांचे कौशल्य होते. ते अत्यंत प्रेमाच्या स्वरात भक्तांना सांगत ‘‘अहो, आमची प्रकृती चांगली आहे आम्हाला द्वितीय श्रेणीत प्रवास केल्याने त्रास होणार नाही. दुसरे असे की आम्ही एकटे त्या फर्स्ट क्लासमध्ये बसणार आणि तुम्ही सर्व मंडळी एकत्रित प्रवासाचा आनंद घेणार. त्यापेक्षा आम्हालाही तुमच्या आनंदात सहभागी करून घ्या ना. दुसरे असे की आमच्या फर्स्ट क्लासच्या तिकीटात आणि सेकंड क्लासच्या तिकीटात जो भाड्याचा फरक असेल ती रक्कम आमच्या ऐवजी कांही पूजा, अभिषेक इ करता खर्च केलीत तर आम्हाला जास्त आनंद आहे‘‘
  2. मुंबईच्या एका भक्ताने त्यांना ऑफिसकडून ऍरिअर्स मिळाले ती रक्कम महाराजांना त्यांच्या वैय्यक्तिक कारणाकरता खर्च करावी अशा इच्छेने मनी ऑर्डरने पाठवली. त्यांचे लगेच उत्तर आले, ‘‘आपण पाठवलेली मनी ऑर्डर मिळाली पण त्याचा विनियोग काय करायचा ते कळवले नाहीत. आश्रमात पूजा अभिषेक देणगी वगैरेपैकी काय करायचे ते कृपया कळवावे.’’
  3. तसेच कोणी त्यांना भारी सोवळे किंवा वस्त्र दिले की लगेच त्यांच्या मनासमोर वाडीच्या पादुका येत आणि म्हणत ‘‘देवांना हे किती छान दिसेल ~‘‘
  4. बहुतेक वेळा अनेक लोक आपले दुःख अगतिक होऊन त्यांच्यासमोर मांडत आणि विचारत त्यांच्याच वाटेला असे दुःख कां यावे वगैरे. महाराज त्यांना हर तऱ्हेने समजावताना म्हणत ‘‘संसारात दुःख कष्ट हे आपल्या संचिताचे फळ असते. आपण त्याची तीव्रता कशी कमी करायची हे पाहू‘‘ आणि त्याच्या दुःखावर फुंकर घालत उपाय सुचवत.
  5. ते दैनिक समाचार पत्र वाचीत असत. पुण्यात असताना सकाळी प्रादेशिक बातम्यांच्या आधी दिल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेतील बातम्या ऐकत असत. जगात घडणाऱ्या महत्वाच्या घटनांची दखल घेत असत. स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवरच्या राजकारणाची त्यांना पूर्ण जाणीव होती, सखोल ज्ञान होते. मुंबईच्या एका बऱ्यापैकी वाचन असणाऱ्या गृहस्थाच्या मनात एकदा सहज विचार आला महाराज तर संत, त्यांचा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास असेल पण त्यांना अमेरिका, रशिया यांचे काय डावपेच चालतात, शीतयुद्ध म्हणजे काय वगैरेची काय कल्पना असणार? पण ते त्यात गुंतलेले नव्हते. त्यांच्याशी थोडेसे बोलले की हे लक्षात यायचे. परंतु नंतर समजून चुकायचे की असे जरी असले तरी त्यांचा मूळ प्राणाधार गंभीर अनुभूतियुक्त अध्यात्मिक जीवन हाच, अन्य सर्व कांही बाह्यतः क्षीण आवरण होते. त्यांचे मन सदा सर्वदा उच्च भूमीवर विचरण करीत असूनही स्वतःला ते संसारापासून पृथक समजत नसत. सामान्य जीवांच्या संसारातील दुःख कष्ट दूर व्हावेत याकरता त्यांना तीव्र तळमळ आणि प्रबळ इच्छा होती.
  6. कोणी जर त्यांच्या सहवासात राहण्याची इच्छा प्रदर्शित केली तर ते समजून काढत. गुरुंजवळ राहून त्यांची सेवा करणे प्रत्येक वेळी संभवनीय आणि फलदायी असते नाही. आपण जे कांही नोकरी धंदा करत असू तो प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणे हीच गुरुसेवा आहे. दीर्घ काल गुरूंच्या सहवासात राहिले तर बुद्धिभेद होण्याचा संभव असतो. कारण जर योग्य दृष्टी नसेल तर गुरु त्याला सर्व व्यवहार इतर चार चौघांसारखेच करताना दिसतात आणि त्यामुळे त्यांची महती कमी होऊ लागते. त्यापेक्षा चारित्र्याची पवित्रता, आत्मोत्सर्ग आणि सेवाभाव हेच त्याचे मापदंड आहेत. नियमित उपासना, साधना वगैरे करून अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी गृहस्थाश्रमी भक्तांना सतत उपदेश करीत आणि दिखावटी धार्मिकता तसेच भ्रामक धर्मनिष्ठा या विरुद्ध सतत सावध करीत.
  7. आश्रमात घडणाऱ्या बारीक सारीक घडामोडींची ते सावधानपूर्वक दखल घेत असत. संस्थेत राहणाऱ्या सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी त्यांचे तळमळीचे प्रयत्न असत.
  8. त्यांचा स्नेह, प्रेम, शासन, अभय आणि उपदेश आजही त्याच्या सहवासात आलेल्या जीवांच्या जीवनांत प्रत्येक भावातून जीवनप्रेरणा देत आहे. आपसात बोलताना जेव्हां त्यांच्या आठवणी निघतात तेव्हां जाणवते की ते आत्तासुद्धा या लोकांचे रक्षण करीत आहेत. माता, पिता, गुरु, इष्ट सर्व कांही त्यांच्यात एकवटले होते. त्यांची अतीत स्मृती, अभयदान, दर्शनाचा आनंद, आमचे अज्ञान, त्यांच्याकडे नेलेल्या तक्रारी, हर एक विषयातील जिज्ञासा आणि त्यांचे उत्तर हे सर्व पाथेय घेऊनच जीवनाची वाटचाल करीत आहोत. प्रत्येक बाबतीत ते भक्तांच्या जीवन नौकेचे कर्णधार होऊन ध्येयमार्गावरील सत्यवस्तूच्या प्राप्तीसाठी प्रेरणा देत आहेत.
  9. श्रीवासुदेव निवासात किंवा त्यांच्या घरी गेले आणि जर ऐकायला मिळाली तर त्यांच्या अमृतवाणीचे आकंठपान करता येत असे. त्यांचे ते उपदेश आमच्यासाठी चिरकाल टिकणारी अमूल्य संपदा बनून गेल आहेत. ते भक्तांचे अंतरंग व बहिरंग पहाणारे अमर्याद अध्यात्मिक शक्तिसंपन्न पुरुष होते. आमच्यातील जे जितके ग्रहण करू शकत त्यांना त्याच तऱ्हेचा उपदेश व आदेश देत.
  10. पूज्यपाद श्रीमहाराजांचे दर्शन उद्दीपनापूर्ण वाणी, असीम हार्दिक आशीर्वाद, भक्तांच्या अंतःकरणात अध्यात्मिक वन्हीचे उद्दीपन, आशा तसेच मानसिक हिंमत प्रदान करणे, भक्तांचे दुःख कष्ट आणि तापत्रय दूर करण्याची अपूर्व शक्ती, सर्वांना आश्रय प्रदान एवढेच नव्हे तर जाति वर्ण यांचा विचार न करता सर्वांप्रती प्रेमभाव प्रदर्शित करणे इ आमच्या जीवनांतील अक्षय आणि अमूल्य संपत्ती ठरली आहे.
  11. त्यांच्या बोलण्यात सतत पुढील उपदेश असे – ईश्वराची तळमळीने प्रार्थना करा, त्याला सर्वार्थाने शरण जा, संतांची चरित्रे, संतांचे ग्रंथ वाचा, जमेल तशी साधना करा. शरणागतभाव महत्वाचा आहे. ‘‘तुजविण आम्हा असे कोण देवा ~—‘‘ हा त्यांचा आवडीचा अभंग होता आणि ते अत्यंत तळमळीने तो म्हणत. संतांची चरित्रे वाचली म्हणजे ज्यांनी सर्व समाजाला आनंद दिला सुख दिले त्यांनी स्वतः किती दुःख भोगले हे आपल्याला समजते. जप तप ध्यान साधना आदि सर्व एक मात्र शरणागती निर्माण होण्यासाठी आहे आणि पुन्हा सर्वतो परी आवश्यक आहे ईश्वर कृपा. अनन्य चित्ताने त्याचे स्मरण, मनन, ध्यान, चिंतन आणि प्रार्थना करीत राहिल्याने तो कृपा करतो. असे त्यांचे सांगणे असे.
  12. अनेक लोक त्यांना विचारत, महाराज साधना कधी करू? ते सांगत, जशी जमेल तशी करा. एकाने विचारले, किती करावी? ते हंसून म्हणाले, विहीर किती खणायची असे विचारले तर काय उत्तर देणार?
  13. गीतेच्या 16 व्या अध्यायात भगवंतांनी जी दैवी गुणसंपदा सांगितली आहे ती सर्वार्थाने श्री महाराजांच्या ठिकाणी विकसित झालेली पहायला मिळे. त्यांच्या अमानित्वाची मोजकी उदाहरणे वर्णन केल्याशिवाय रहावत नाही. श्रीमहाराजांना वाडीसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर नमस्कारसुद्धा करून घेण्यात संकोच वाटतो हे माहीत नसलेले एक गृहस्थ एकदा श्रीमहाराजांचा वाडीत मुक्काम असताना तिथे गेले. श्री महाराज मनोहर पादुकांसमोर उभे होते. हे गृहस्थ आपल्या गुरुभावनेने श्री महाराज दिसताक्षणीच त्यांना नमस्कार करायला वाकले. महाराज लगेच मनोहर पादुकांकडे इशारा करीत म्हणाले, अहो, हे काय करत आहात. ते बसले आहेत ना ~ त्यांच्यासमोर आम्हाला नमस्कार करू नका.
  14. श्रीगुरुमहाराजांच्या एका अनुग्रहिताच्या मनात एकदा विकल्प आला. श्रीमहाराज श्रीवासुदेवनिवासात गुरुमहाराजांच्या खोलीत किंवा त्यांच्या आसनावर बसत नाहीत कारण आपली तेवढी योग्यता नाही असा त्यांना न्यूनगंड असावा. ही गोष्ट श्रीमहाराजांकडे नेहमी जाणाऱ्या एका गृहस्थाजवळ बोलून दाखवली एवढेच नव्हे तर हे असेच आहे की नाही हे श्रीमहाराजांना विचारण्यास सुचवले. त्या गृहस्थाने श्रीमहाराजांना हे स्पष्ट सांगितले आणि श्रीगुरुमहाराजांच्या आसनावर न बसण्याचे कारण विचारले. श्री महाराज हंसून म्हणाले, ‘‘श्रीमहाराज देहात असताना आम्ही कधी त्यांच्यासमोरसुद्धा बसलो नाही. आज ते नाहीत असे आम्ही मानत नाहीत ते अव्यक्त रूपाने इथे आहेतच मग ते असताना आम्ही त्यांच्या आसनावर कसे बसायचे?‘‘
  15. श्रीवासुदेवनिवासात गेल्यावर जर एखाद्याने एक हार नेला तर तो स्वतः घालून न घेता श्रीगुरुमहाराजांना घालायला सांगत. तसेच त्यांच्यासमोर साधनेला बसायचा आग्रह धरला तर श्रीगुरुमहाराजांच्या खोलीत साधनेला बसायला सांगत.
  16. त्यांच्या प्रतिभाशक्तीला वाङ्मय निर्मिती करणे काय अशक्य होते? त्यांनी करायचे ठरवले असते तर आदि शंकराचार्यांप्रमाणे वाङ्मय निर्मिती केली असती पण परंपरेचा त्यांनी मान राखला. प पू श्रीगुरुमहाराजांनी कांहीही लिखाण केले नाही याचे कारण सांगताना ते म्हणत त्यांच्या गुरूंनी म्हणजे प प श्रीवासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांनी इतके कांही लिहून ठेवले आहे की ते आणखी काय वेगळे लिहिणार? तीच परंपरा श्री महाराजांनी चालू ठेवली. योग्यता व पूर्ण शक्ती असूनही कांही वाङ्मय निर्मिती केली नाही.
  17. दादरला श्री जुवेकरांकडे प पू श्रीनानामहाराज मुक्कामाला आले होते. त्यांनी श्री महाराजांना बोलावले. दोघांनाही आसने तयार केली होती. श्री नानांनी श्री महाराजांचे यथा योग्य स्वागत केले आणि आसन ग्रहण करण्यास सांगितले पण महाराज त्यावर बसेनात. का? तर ती दोन्ही आसने एकाच उंचीची होती! शेवटी श्री नानांच्या आसनापेक्षा कमी उंचीचे आसन घेऊन श्री महाराज त्यावर बसले.
  18. असाच प्रसंग श्री नागले यांच्या हरिहरेश्वर येथील घरी घडला होता. श्री नागल्यांनी त्या वेळी एका संन्याशालाही तिथे बोलावले होते. त्यांच्या घराच्या मागच्या अंगणात श्री महाराजांकरता एक खुर्ची ठेवली होती आणि समोरच्या औदुंबराच्या पारावर संन्याशाची बसण्याची सोय केली होती. श्री महाराजांनी खुर्चीवर न बसता एक पाट घेऊन खाली बसले. श्री महाराज त्या खुर्चीवर कां बसत नाहीत Ì हे सुरवातीला कोणाच्या लक्षात येईना. नंतर समजले की संन्यासी कसाही असला तरी वंदनीय असतो. श्री महाराजांचा अध्यात्मिक किंवा ज्ञानाचा अधिकार कितीही मोठा असला तरी ते गृहस्थाश्रमी होते म्हणून ते पारापेक्षा इंच दोन इंचाने उंच असलेल्या खुर्चीवर ते बसले नाहीत. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
  19. श्रीवामन निवासाकरता निधी जमा केला जात होता. कधी लोक श्री महाराज दौऱ्यावर असले तर त्यांच्याबरोबर न जाता पुण्यात थांबलेल्या व्यक्तीजवळ पैसे देत असत आणि मग श्रीमहाराजांची भेट झाल्यावर त्यांना तसे सांगत. एकदा असेच एका बाईने श्री महाराजांना त्यांच्या दौऱ्याच्या काळात कोणाजवळ पैसे आणून दिले ते महाराजांना येऊन मिळाले का विचारले. श्री महाराजांच्या लक्षात आले की त्या गृहस्थांनी ते पैसे श्री महाराजांनाही सांगितले नाही आणि आश्रमातही जमा केलेले नाहीत. श्री महाराजांनी त्या बाईंना पैसे मिळाल्याचे सांगितले पण नंतर स्वतःजवळची तेवढी रक्कम आश्रमात जमा करून त्या बाईंना पावती दिली. ज्यांनी त्या पैशाचा अपहार केला ते गृहस्थ महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होते त्यांची शोभा करण्यापेक्षा प्रकरण मिटवणे आणि संस्थेचे लज्जा रक्षण करणे हे महत्वाचे होते. ते गृहस्थही इतके निढावलेले होते की त्यांना महाराजांनी या पूर्वीही अशी गैरकृत्य न करण्याबद्दल समजावूनसुद्धा आणि महाराजांनी पैसे भरले हे समजूनसुद्धा पश्चात्ताप झाला नाही व त्यांनी आपली चूक कबूल केली नाही.
  20. कोणी शक्तीपात दीक्षा ग्रहण करण्याकरता आला तर ते त्याला त्याच्या उपास्य देवतेचे नांव विचारित किंवा श्री गुरुमहाराजांचा फोटो आहे का विचारित. त्याने होकार दिला की दीक्षेचा मुहूर्त सांगून फोटो समोर दीक्षा ग्रहण करण्यास बसण्यास सांगत. पुढे म्हणत तेच तुम्हाला दीक्षा देणार आहेत. एका चिकित्सक गृहस्थाने महाराजांना विचारले, मग तुम्ही काय करता? ते चटकन म्हणाले, आम्ही फक्त त्या जीवाचे कल्याण व्हावे म्हणून प्रार्थना करतो. त्यांच्या या प्रार्थनेतच किती सामर्थ्य होते ते आपण पाहिलेच आहे.
  21. अनेकांनी त्यांना त्यांच्या पायात घातलेल्या पादुका मागितल्या. त्यांनी कधीच दिल्याचे ऐकीवात नाही. हिंगोलीच्या श्री देवरांनी भक्तीभावाने चांदीच्या पूर्ण आकाराच्या पादुका करून त्या महाराजांच्या पायात घालूनच घ्यायचा निर्धार केला होता. महाराज त्यांच्या घरी आले असता त्यांनी महाराजांना त्या पादुका पायात घालण्यास सांगितले. महाराजांनी चतुरपणे त्या मस्तकावर धारण करून त्यांच्याबरोबर पाद्यपूजेकरता ज्या चांदीच्या परंपरागत पादुका होत्या त्यांच्या शेजारी ठेवून दोन्ही पादुकांचा एकमेकांना स्पर्श करविला. कोणाला ते काय करतात हे लक्षातच आले नाही. नंतर जेव्हां यजमान त्या मोठ्या पादुका पायात घालायचा आग्रह करू लागले तेव्हां म्हणाले पूजेतल्या पादुकांचा स्पर्श ज्यांना झाला आहे त्या पायात कशा घालता येतील? त्या आता पूजेतच ठेवल्या पाहिजेत. यजमानांना काय बोलावे समजेना. महाराजांकडून पुजेकरता त्यांना पादुका तर मिळाल्या होत्या हे नाकारता येत नव्हते.
  22. मुंबईच्या कांही भक्त मंडळींसमवेत ते काशीयात्रेला गेले होते. त्या वेळी तिथल्या ब्राम्हणांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे लोकांना महाराजांच्या अपरोक्ष सांगितले ‘‘इथे अमूक अमूक श्राद्ध वगैरे विधी केलेत की पुन्हा तुम्हाला कधी श्राद्ध करायला नको‘‘ पण ते विधी करण्याकरता ते सामान्या माणसांच्या शास्त्राबद्दलच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन भरपूर पैसे उकळत. त्यांचे म्हणणे जेव्हां महाराजांना सांगितले तेव्हां निंदेचा किंवा टीकेचा शब्द न उच्चारता ते म्हणाले, ‘‘आम्ही दर वर्षी श्राद्ध पक्ष करतो‘‘.
  23. अवज्ञा जर एखाद्याकडून अजाणतेपणाने झाली तर त्याला न दुखवता ते त्याची चूक समजावून देत. ते जालन्यात एकदा एका भक्ताच्या घरी उतरले होते. त्या घरासमोर पोस्टाची छोटी टांगलेली पत्र पेटी होती. श्री महाराजांनी त्यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तीला पत्र लिहून त्या समोरच्या पेटीत टाकायला सांगितली. तो जेव्हां पत्र टाकायला निघाला तेव्हां यजमानीणबाईंनी त्याला सांगितले ‘‘त्या पेटीत कशाला टाकता, बरेच वेळा चार चार दिवस ती पेटी उघडत नाहीत. माझ्याकडे द्या मी आमच्या नोकराला मेन पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पत्र टाकायला सांगते‘‘ यालाही त्यात कांही गैर वाटले नाही. याला वाटले जर दीक्षेच्या तारखा देणारी पत्रे असतील आणि या भाभी सांगतात त्याप्रमाणे जर ही पेटी चार चार दिवस उघडलीच गेली नाही तर? या विचाराने त्यानेही भाभीना संमती दिली. दोन दिवसांनी महाराजांनी त्याला आठवणीने त्याने पत्र कुठे टाकली ते विचारले. त्याने खरे ते सांगितले. त्यावर ते एवढेच म्हणाले, ‘‘आम्ही यापूर्वी त्या पेटीत टाकलेली पत्रे लोकांना वेळेवर मिळाली होती‘‘.
  24. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करून यश संपादावे यावर त्यांचा भर होता. तसेच नोकरी करणाऱ्याने आपली नोकरी आपली जबाबदारी लक्षात घेऊन निष्ठेने, प्रामाणिकपणे करावी तीच गुरुसेवा आहे असे त्यांचे सांगणे होते. पूर्णपणे समर्पण भाव निर्माण झाल्याशिवाय उगीचच आपण आपला सगळा भार गुरूंवर, देवावर टाकून निष्क्रिय राहणे त्यांना पसंत नव्हते. त्याकरता ते श्रीमारुतीरायांचे उदाहरण देत. श्रीरामचंद्रांनी राज्यारोहण केल्यावर ज्यांनी ज्यांनी त्यांना सीतेचा शोध घेण्यात मदत केली त्या सर्वांचा यथा योग्य सन्मान केला. जेव्हां श्रीमारुतीराय आले तेव्हां श्री रामचंद्र त्यांना म्हणाले, ‘‘तूं जर सीतेचा शोध लावला नसतास तर पुढे कांहीच घडले नसते. त्यामुळे मी तुझ्या उपकारांची परतफेडच करू शकत नाही. कारण जर प्रत्युपकार करायचा म्हटला तर तूं संकटात आला पाहिजेस आणि तूं संकटात यावास अशी मी इच्छाच करू शकत नाही. तेव्हा हा तुझा उपकार माझ्याच ठायी जिरो दे ‘‘ इ त्यावर श्रीमारुतीराय म्हणाले, ‘‘देवा, झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणारा मी एक सामान्य वानर आहे. केवळ आपल्या शक्तीनेच समुद्र पार करून जाऊ शकलो. ‘‘ महाराज म्हणतात, असे असावे. आपल्या प्रयत्नांनी यश मिळवावे आणि मिळाल्यावर त्याचे श्रेय आपल्या उपास्य देवतेला द्यावे. वास्तविक पहाता श्रीमारुतीरायांनी योगाभ्यास करून सिद्धी मिळवल्या होत्या. त्या सिद्धीच्या सहाय्याने शरीर मोठे करून ते समुद्र पार करून गेले पण त्यांनी स्वतःकडे कोणतेही कर्तृत्व घेतले नाही. अशी आपली भावना असावी. सर्व कर्तृत्व ईश्वराचे आहे हाच गीतेचा महत्वाचा सिद्धांत आहे.
  25. श्रीमहाराजांचा भिवंडी येथे श्रीभागवत सप्ताह चालू होता. मुंबईतल्या एका साधकाची मुलगी 10 वी च्या परिक्षेला बसणार होती. त्याच्या गुरुबंधूला सहजभावाने वाटले तिला श्रीमहाराजांच्या दर्शनाला नेऊन आणावे म्हणजे त्यांचे आशीर्वाद मिळतील. त्याच्या आग्रहास्तव ते तिघे भिवंडीला गेले. श्रींच्या खोलीच्या दारात ती पाऊल टाकताच श्री म्हणाले, ‘‘तुम्ही इथे आलात म्हणजे आज तुमचा संध्याकाळचा क्लास बुडला‘‘ यावरून त्यांना काय म्हणायचे होते हे आपल्या सहज लक्षात येईल की आमच्या दर्शनापेक्षा तुमचा अभ्यास महत्वाचा आहे, आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच.
  26. भारतीय संस्कृतीत निराशावाद नाही हा त्यांचा पक्का सिद्धांत होता आणि तो व्यावहारिक जीवनाचे मार्गदर्शन करतानाही अनुभवास येत असे. सुमारे तीस वर्षांपूर्वीची घटना आहे. गिरीश नांवाच्या एका तरुणाने मुंबईतल्या एका सरकारी खात्यात नोकरीचा अर्ज केला होता. पुढे वर्ष दोन वर्ष कांही त्याला कॉल आला नाही. श्रींनी त्याच्या अर्जाचे काय झाले हे त्याला विचारल्यावर तो वैतागून म्हणाला त्याने अर्ज केला होता पण कांही उपयोग झाला नाही. श्रींनी त्याला त्याने परत अर्ज केला का किंवा चौकशी केली का असे विचारल्यावर तो आणखीनच चिडून म्हणाला, परत कशाला अर्ज करायचा, तिथे जागा नाही इ. त्यावर श्री म्हणाले, तुम्ही जेव्हां अर्ज केलात तेव्हां तिथे पद रिक्त नव्हते हे आम्ही मान्य करतो पण गेल्या दोन वर्षात कोणी निवृत्त झाले असेल, कोणाची बदली झाली असेल किंवा कोणाला प्रमोशन मिळाले असेल, थोडक्यात जागा रिकामी झाली असेल प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.
  27. श्री जेव्हां 1983 साली काशीयात्रेला गेले होते तेव्हां परतीच्या प्रवासाबद्दल बोलणे झाले. काशीहून जी महानगरी एक्स्प्रेस सुटते तिला पुण्याचा एक डबा जोडतात आणि तो मनमाडला सोडून दुसऱ्या गाडीला जोडून पुण्याला आणतात. रेल्वेच्या गलथान कारभारामुळे कधी कधी तो पुण्याचा डबा काशीत महानगरीला जोडला गेला नव्हता हे बरोबरच्या एकाने श्रींच्या निदर्शनास आणले आणि ते जेव्हां परत निघतील त्या दिवशी असे झाले तर काय करायचे अशी भीती व्यक्त केली. त्यावर श्री एवढेच म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घडलेही असेल पण ते आपल्या प्रवासाच्या वेळी घडेल असे आपण कां धरून चालायचे? ‘‘
  28. या काशीयात्रेला जाण्यापूर्वी अनेकांनी त्यांना जे सोनेनाणे, वस्त्र इ अर्पण केलेली होती ते सर्व जमा केले होते आणि काशीला गेल्यावर त्या सोन्याच्या वस्तू प्रत्येक वेळी दर्शनाला गेल्यावर शिवलिंगावर अर्पण करून मोकळे होत नंतर पुजाऱ्यांनी झडप घालून ते घेतले वगैरे कडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यावर एक शब्द काढत नसत. तसेच तिथल्या विद्वानांना विद्वतसभेच्या निमित्ताने सुवर्ण व वस्त्रदान करीत. जेव्हां ते पुण्याला परत यायला निघाले तेव्हां त्यांनी त्यांची व्यवस्था पहाणाऱ्याला सोबतच्या गृहस्थाला विचारले, ‘‘आता कांही रिक्षाभाडे किंवा प्रासंगिक कांही खर्चाशिवाय पैसे शिल्लक नाहीत ना?‘‘ त्याने नकार दिल्यावर मोठ्या कृतार्थतेने म्हणाले, गंगामैयाने सर्व दानधर्म करून घेतला.
  29. आपल्याला आता व्यावहारिक गोष्टी सोडून फक्त भक्तीमार्गावरच वाटचाल करून उत्तम साधना करायची आहे असा निश्चय करून महाराजांची दीक्षा घेतलेल्या एका गृहस्थाचे थोड्याच दिवसात मन चंचल झाले आणि कांही शैक्षणिक अभ्यासक्रम करावा असे त्याला तीव्रतेने वाटू लागले आणि तशी परवानगी घेण्याकरता त्याने महाराजांना पत्र लिहिले. महाराज उत्तरात म्हणतात, ‘‘जीवनोपयोगी कुठलीही विद्या शिकायला हरकत नाही पण तसे करताना आपण स्वेच्छेने जो मार्ग निवडला आहे, जे ध्येय ठरवले आहे त्याच्याशी प्रतारणा तर होणार नाही एवढा विचार करून निर्णय घ्यावा.‘‘
  30. मुंबईचे एक गृहस्थ दीक्षा झाल्यावर दोन तीन दिवस श्रीवासुदेवनिवासात राहून परत गेले आणि महाराजांना त्यांनी पत्रात लिहिले, ‘‘— आपल्या सहवासात राहिल्याने मनाची गडबड थांबली, गोंधळ दूर झाला—-‘‘ महाराज त्यांना लिहिलेल्या उत्तरात सांगून जातात, ‘‘ईशकृपेने आपल्या मनाची गडबड थांबली, गोंधळ दूर झाला हे वाचून समाधान वाटले. श्रीवासुदेवनिवास येथे श्रीमहाराजांचा (म्हणजे प पू श्रीगुळवणीमहाराजांचा) साक्षात निवास आहे अशी आमची भावना आहे आपलीही तशीच असावी.‘‘
  31. तीर्थक्षेत्री गेल्यावर काय करावे असे विचारल्यावर ते म्हणत, जेवणाचा व झोपेचा वेळ वजा जाता तन मन धनाने जास्तीत जास्त देवाची सेवा करावी. तीर्थक्षेत्री केलेल्या कोणत्याही पुण्यकर्माला लक्षपट फळ आहे.
  32. बाहेरचे हॉटेल वगैरेमधले खाणे खाऊ नये हे महाराजांनी एका प्रसंगाने फार खुबीने सुचवले. मुंबईचे एक साधक पुण्याला श्रीवासुदेवनिवासात मुक्कामाला गेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याहून एस टी ने कोकणात जायचे होते. महाराजांनी त्यांना आदल्या दिवशी आश्रमातून घरी जाताना म्हटले, उद्या सकाळी इथे कांही पोहे वगैरे खाऊन निघा. घरी पोहोचायला उशीर होईल तोपर्यंत वाटेत कांही खायला मिळणार नाही.
  33. स्टेट बँकेत नोकरी करणाऱ्या एका साधकाने महाराजांना म्हटले की दिवाळी, दसरा वगैरे सणासुदीला बँकेशी संबंधित कांही व्यापारी व इतर व्यावसायिक ग्राहक भेट वस्तू किंवा मिठाईचे पुढे वगैरे आणून देतात ती स्वीकारण्यास नकार दिला तर इतरांचा रोष ओढवून घेतला जातो आणि मन तर स्वीकार करायला तयार नसते अशा वेळी काय करावे? महाराज तत्काल म्हणाले, जर तुम्हाला मनापासून ते नको असेल तर त्याला स्पर्शसुद्धा करू नका. तुमच्या ऑफिसातल्या ज्यांना त्याचा हव्यास आहे अशा लोकांना ते परस्पर उचलून घेऊन जाण्यास सांगा.
  34. त्यांच्या ध्वनिमुद्रित प्रवचनाची प्रत एका दीक्षिताला त्यांच्याकडून तपासून हवी होती. महाराजांचा वेळ वाचावा म्हणून त्याने फक्त जिथे शंका होती तिथे खुणा करून तेवढेच महाराजांनी तपासून द्यावे अशी प्रार्थना केली. महाराजांनी ते लिखाण ठेवून घेतले आणि लवकरच परत केले तेव्हां त्याचा पानन पान आणि शब्दन शब्द त्यांनी तपासला होता.
  35. त्यांना चमत्कार करायची आवश्यकता नव्हती पण प्रसंगाने त्यांच्या दैवी शक्तीचा आविष्कार सहज पहायला मिळत असे. श्री महाराज खर्ड्याला आहेत समजल्यावर शनिवारी ऑफिस सुटल्यावर कांही महत्वाच्या प्रश्नावर बोलण्याकरता मुंबईहून तिकडे कारने जायचे असे त्यांच्या कांही भक्तांनी गुरुवारी रात्री ठरवले आणि त्याप्रमाणे शनिवारी ते दुपारी निघणार होते पण शनिवारी सकाळीच त्यांच्यापैकी एकाला महाराजांचे खर्ड्याहून पत्र आले आणि त्यात महाराजांनी ही मंडळी येण्यापूर्वीच ते पुढच्या मुक्कामाला जाणार असल्याचे यांची खेप फुकट जाऊ नये म्हणून कळवले होते.
  36. कलीयुगात संघ शक्तीला महत्व आहे अशी त्यांची धारणा होती आणि संस्थेकरता चांगले कार्यकर्ते तयार करण्यावर त्यांचा भर होता. ते कुशल संघटक होते आणि व्यक्तिमत्व घडवणे हा त्यांचा हातखंडा होता. त्यांनी अनेक लोक सांघिक कार्याकरता घडवले, त्यांच्याकडून भरघोस कार्ये करून घेतली. अशा वेळी सर्वात महत्वाचा भाग असतो महाराजांसारख्या अधिकारी महात्म्याचा पाठींबा. ज्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्याच्याकडून जर यदा कदाचित चूक झालीच तर ते खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहून स्वतः ती नैतिक जबाबदारी स्वीकारीत. सत्तेच्या केंद्रीकरणापेक्षा विकेंद्रीकरणाकडे त्यांचा भर होता. असेच एका स्थानात कांही बांधकाम चालू होते. तिथल्या अधिकारी व्यक्तीने प्रत्येक गोष्ट विचारायला महाराजांकडे पाठवायला सुरवात केली. महाराज त्या गृहस्थाला म्हणाले, ‘‘असे सारखे कशाला येता? तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. जरी कांही कमी जास्त झाले तर आम्ही सांगू तो आमचा निर्णय होता.‘‘ अशा आश्वासनामुळे सुदैवी भक्त कोणतीही जबाबदारी स्वीकारायला तयार होत.
  37. गुरुभक्त श्री नागलेंची श्रीवामननिवासाच्या बांधकामाकरता नियुक्ती झाल्यावर श्री महाराजांनी एक अधिकार पत्र स्वतःच्या सहीने तयार करून संबंधितांना दिले. त्यात त्यांनी म्हटले की श्री नागले यांनी बांधकामासंबंधी घेतलेला कोणताही निर्णय त्यांचा निर्णय समजावा.
  38. त्यांना सदैव दुसऱ्या माणसाचा विचार असे. दुसऱ्याला कमीत कमी त्रास कसा होईल हे ते पहात असत. एकदा मुंबईच्या एका भक्ताला कांही अनुष्ठान करण्याकरता महाराजांचे आशीर्वाद हवे होते म्हणून तो पुण्याला आला पण त्यावेळी नेमके महाराज दौऱ्यावर होते. पुढच्या रविवारी भेट झाल्यावर महाराजांनी येण्याचे कारण विचारले. याने सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘कशाला इतक्या लांब भाडे खर्च करून यायचे. एक पोस्ट कार्ड टाकले असते तरी काम झाले असते. हरकत नाही. आता या पुढे लक्षात ठेवा तुम्ही कोणतेही पुण्य कर्म, सत्कर्म करा ईश्वराचे सद्गुरूंचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. पुन्हा तेवढ्याकरता विचारायला येऊ नका.‘‘ हे शाश्वत स्वरूपाचे मार्गदर्शन दिले.
  39. त्यांच्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीचे मन सांभाळणे इतरांना कोणाला जमणार नाही. मुंबईला एकदा एका गृहस्थांच्या घरी ते प्रसंगाने मुक्कामाला गेले. त्यांची जागा लहान होती. त्यांनी श्रींना म्हटले, जागा लहान असल्याने आपली पाहिजे तशी सोय होऊ शकली नाही वगैरे. त्यावर श्री हंसत म्हणाले, अहो, कानडीत एक म्हण आहे. जागा लहान असली तरी हरकत नाही पण मन मोठे असले म्हणजे झाले.
  40. त्यांच्या समोरच्याला आनंद देण्याचे असंख्य उदाहरणांपैकी एक उदाहरण असे सांगता येईल. एकदा ते श्रीभागवत सप्ताहाकरता जालन्याला चालले होते. औरंगाबादमध्ये राहणाऱ्या श्री भाऊसाहेब क्षीरसागरांचे व त्यांचे फार पूर्वीपासून घनिष्ठ संबंध होते. श्रींनी वाटेत त्यांचे घर आल्यावर कार थांबवली आणि उभ्या उभ्या भाऊसाहेबांना भेटायला गेले. भाऊसाहेब व माईंना तर श्री अचानक आल्यावर किती आनंद झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यांनी श्रींना, आता, जेवूनच जा, असा आग्रह केला. श्रींनी त्यांना समजावले की भगवतीस्वरूप सौ ताईमहाराजांकडे जायचे असल्याने आत्ता कांही स्वीकारता येत नाही पण ते मुद्दाम परत येतील. ते पुढे म्हणाले, असे म्हणतात देवदर्शनाला एकदा बाहेर पडल्यावर एका खेपेत चार मंदिरात जाऊ नये. गणपतीचे दर्शन करून घरी यावे परत दत्ताच्या देवळात जावे. तिथून परत घरी येऊन पुढच्या देवाच्या दर्शनाला जावे. तसे आम्ही स्वतंत्र तुमच्याकडे येऊ की. आत्ता अगदीच दारावरून चाललो होतो तसे जाववेना म्हणून आलो. त्या उभयतांना श्रींची ही आत्मीयता पाहून काय वाटले असेल!
  41. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे श्रीमत् भगवत गीतेच्या 16 व्या अध्यायात वर्णन केलेले सर्व दैवी गुण श्रींच्या ठिकाणी पूर्णपणे विकसित झाल्याचे ज्यांना पहायला मिळाले ते भाग्यवान. प्रत्येक गुणाचा पूर्ण विकास झालेला त्यांच्या व्यक्तिमत्वात पहायला मिळाला. त्यांना जीवनांतल्या आनंददायी, चांगल्या प्रत्येक गोष्टीत रुची होती. अतिशय अभिरुचीसंपन्न ते होते. त्यांचा कशाचा अभ्यास नव्हता हाच प्रश्न पडावा. साहित्यवाचन म्हटले तर त्यांना साहित्याचार्यच म्हणावे लागेल. प्राचीन आणि अर्वाचीन दोन्ही उत्कृष्ट साहित्य त्यांनी वाचले होते. संगीताची त्यांना सखोल जाण होती. ते स्वतः उत्कृष्ट तबला वाजवत. अगदी वृद्धावस्थेतही ते प्रसंगाने कोणी आग्रह केला तर अभंग म्हणत. लहानपणी कसून व्यायाम केल्यामुळे त्यांच्या भव्य शरीरयष्टीला मजबूती होती. कृष्णाच्या पुरात पोहणारे होते. अहिंसा, त्याग, सत्यवचनी, दया, मार्दव, क्षमाशीलता वगैरेंची असंख्य उदाहरणे देता येतील पण विस्तारभयास्तव देता येत नाहीत.

प. पू. दत्तमहाराजांच्या सानिध्यात‘ हा स्मृतीसंग्रह डाउनलोड करा