या थोर गणेश भक्ताचा जन्म वाई येथे 12 सप्टेंबर 1915 (श्रीगणेश 4) ला झाला. आयुर्वेदाचार्य झाल्यावर त्यांनी कांही वर्ष वैद्यकीय व्यवसायही इचलकरंजी येथे केला. पण लहानपणापासून त्यांना गणेश उपासनेची आवड होती व उत्तम स्वधर्माचरण करून मानवी जीवनाचे सार्थक करावे असा त्यांना ध्यास लागला होता. त्यामुळे संसाराच्या फापट पसाऱ्यात न अडकता समजायला लागल्यापासूनच अध्ययन व पुढे व्यवसायाच्या व्यतिरिक्त जप, तप, ध्यान धारणा, अनुष्ठाने व इतर उपासना यातच ते जास्त रममाण होत असत. त्यांची वैद्यकीय उत्तम चालू असता त्यांना अत्यंत तीव्रतेने संन्यास घेण्याची प्रेरणा झाली.
त्यांच्या वडिलांनी त्यांचे मन वळवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले आणि तो मार्ग किती कठिण आहे याची त्यांना कल्पना दिली तरी त्यांचा निश्चय दृढ होता. सुरवातीला त्यांनी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या गोदावरीच्या तीरावरील तीर्थ क्षेत्र नाशिकला जाऊन गायत्रीपुरश्चरण करायला आरंभ केला. ते पूर्ण व्हायच्या आधी त्यांचे पिताजी त्यांना भेटायला नाशिकला आले. यांची प्रगती पाहून त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी यति महाराजांना, यतिमहाराजांचा निर्णय योग्य असून आपले मत बदलल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी यतिमहाराजांना त्यांचे उर्वरित आयुष्य दिले. घरी परत गेल्यावर महिन्याच्या आतच त्यांनी देह ठेवला.
त्यानंतर यतिमहाराजांनी कांही काळ सज्जनगडावर प प श्रीश्रीधरस्वामींच्या बरोबर वास्तव्य केले. पुढे ‘‘रेवा तीरे तपम् कुर्यात् ‘‘ या उक्तीप्रमाणे नर्मदातीरावर दोन वर्ष तप केले. आणि त्यांच्या आदर्श असलेल्या प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांच्या समाधी स्थानी गरुडेश्वर येथे प प श्रीजनार्दन सरस्वती महाराजांकडून संन्यास दीक्षा घेतली आणि चतुर्थाश्रमाचा आदर्श या कलीयुगात प प श्रीवासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांच्या नंतर सर्वांसमोर ठेवला.
ईश्वरावर पूर्ण भरवसा ठेवून संपूर्ण भारताची दोन वेळा तीर्थ यात्रा केली. संन्यास घेतल्यापासून द्रव्याला देहत्यागापर्यंत कधी स्पर्श केला नाही. प्रवासाला निघाले की स्टेशनवर कोणाला तरी प्रेरणा होऊन तो यांच्या तिकीटाची व्यवस्था करीत असे. सुरवातीला त्यांनी भिक्षान्न घेतले पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की युगप्रभावामुळे आचारधर्माचा लोप झाला आहे आणि योग्य शास्त्रीयरीत्या स्वैपाक होत नसल्याने भिक्षान्न घेणे हितावह नाही म्हणून ते अन्नत्याग करून सुरवातीला फक्त सातूचे पीठ पाण्यात कालवून घेत. सवय नसल्याने त्यांना सुरवातीची दोन वर्ष खूप त्रास झाला पण त्यांनी आचारधर्मपालनापुढे त्याची पर्वा केली नाही. पुढे तेही सोडले आणि फलाहार व दुधावरच रहाू लागले.
त्यांनी पंडित लक्ष्मणशास्त्री मुरगुडकर, कल्याणपंत कुलकर्णी, प पू श्रीधुंडिराजमहाराज, पं जेरेशास्त्री यांच्याकडे संस्कृत व शास्त्राचा अभ्यास केला. प पू श्रीगुळवणीमहाराज, प पू श्रीदत्तमहाराज यांच्याशी त्यांचा अतूट प्रेमसंबंध होता. जीवनाच्या उत्तरार्धात वाडीपासून कांही अंतरावर असलेल्या उगार या गांवी स्थिरावले. त्यामुळे पुढे त्यांची प्रसिद्धी उगारचे स्वामी म्हणून झाली. पुण्यात आल्यावर प पू श्रीदत्तमहाराजांबरोबर ते सत्संग करीत असत. आद्य शंकराचार्यांच्या ग्रंथाचा त्यांचा विशेष व्यासंग होता. कांची कामकोटीच्या शंकराचार्यांनी यांचा ‘‘यति धर्मा पालनाचा आदर्श‘‘ या शब्दात विशेष गौरव केला होता आणि ते प्रसंगी उगारला नारायण यतींच्या सहवासात येऊन राहात असत. यांच्याकडून मार्गदर्शन घेत. ते कांचीला असताना कांही संन्याशांना यति महाराजांकडे शंका निरसनाकरता पाठवत. यतिमहाराजांच्या अधिकारामुळे व प्रेमामुळे कांची कामकोटीचे प प श्री चंद्रशेखर सरस्वती महाराष्ट्राच्या दौऱ्यात उगारला तीन महिने राहिले होते.
उगार येथे दीर्घ काळ वास्तव्य केल्यावर शेवटची दोन वर्ष त्यांनी आपल्या आवडत्या स्थानात म्हणजे श्रीक्षेत्रनरसोबावाडीत दोन वर्ष मुक्काम केला होता आणि सर्वांचा निरोप घेऊन ते उत्तरेला काशीक्षेत्राकडे गेले. प प श्री नारायण यतिमहाराजांनी 1999 च्या एप्रिल महिन्यात वाराणसी येथे देह ठेवला. जवळच्या भक्तांना त्यांनी त्यांच्या महासमाधीची तारीख, वेळ सांगून ठेवली होती.
यतिमहाराजांनी तीन तपाहून अधिक काळ साधकांना मार्गदर्शन केले. गणेश, दत्त उपासनेचा प्रसार केला. उपासनेवर त्यांचा विशेष भर होता. आत्मज्ञान प्राप्तीनेच माणसाला शांती-सुख-समाधानाचा लाभ होतो असे त्यांचे स्वानुभवावर आधारित सांगणे होते.
त्यांनी स्वतःच्या तपोबलाने पुढ़िल दोन मंत्र सिद्ध केले –
मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ~~
आणि
श्रीपादश्रीवल्लभनरहरि दत्तात्रेया दिगंबरा ~
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा ~~