कवीश्वर घराणे आणि श्रीक्षेत्र नरसोबावाडी यांचा तीन पिढ्यांचा अतूट संबंध आहे. त्यांचे मूळ आडनांव दीक्षित पण त्यांच्या आजोबांनी नरसोबा वाडीला राहायला आल्यावर रोज ५ श्लोक रचून ती स्तुतिसुमने श्रीदत्ताच्या चरणी अर्पण करण्याचा परिपाठ ठेवला. त्यांच्या उत्कृष्ट व प्रासादिक काव्यप्रतिभेवरुन लोक त्यांना कवीश्वर म्हणू लागले. दत्तप्रभुंच्या अनुमतीने ते वाडीत स्थायिक झाले. कागवाडच्या फणसळकरांनी कृष्णाकाठचा तीन मजली वाडा दान दिला, पुढे कुरुंदवाड संस्थानिकांकडूनही कांही जमीन जुमला मिळाला.
बालपणापासूनच वक्रतुंडमहाराजांचा देवभक्तीकडे ओढा होता. मुंज झाल्यावर आपल्या विद्वान वडिलांजवळ त्यांनी वेद, शास्त्र, पुराण, वगैरे परंपरागत शिक्षण घेतले. वाडीत देवासमोर पुराण सेवा करायची प्रथा त्यांच्यापासून सुरु झाली. वाडीतील थोर अधिकारी सत्पुरुष गोविंद स्वामींकडून त्यांना मंत्रोपदेश झाला. मोठे महाराज प्रथम वाडीला आल्यापासून वक्रतुंड महाराजांचा आणि त्यांचा संबंध आला. देवांनी मोठया महाराजांना पार्थिव पूजा करण्याची आज्ञा केली त्या पूजेचे विधान कवीश्वरबुवांकडे मिळेल असे सांगितले. त्याप्रमाणे बुवांनी ते विधान मोठया महाराजांना दिले.
यांना अनेक अपत्ये होऊन गेली. शेवटी गोविंद स्वामींनी त्यांच्या स्वतः जवळची छोटी दत्तमूर्ती प्रभावळीसह बुवांना देऊन सांगितले, या पुढे तुझी संतती वाचेल आणि तुला एक अलौकिक पुत्र होईल. त्याप्रमाणे पुढे त्यांच्या कृपेने धुंडिराजमहाराजांचा जन्म झाला.
श्री वक्रतुंड महाराजांपासून श्रीदत्तमहाराजांपर्यंत हा संबंध अखंड टिकून राहिला होता. या महात्म्यांचा विशेष असा की ईश इच्छेनुसार या तीनही महात्म्यांचा संचार कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात झाला पण त्या सर्वांचे प्रिय स्थान श्रीनरसोबावाडी हेच होते. परंपरागत या घराण्यात श्रीगणेशाची उपासना चालत आली होती पण वाडीत स्थिरावल्यापासून श्रीदत्तप्रभुंच्या भक्तीची तिला जोड मिळाली. वाडीमध्ये त्यांची परंपरागत निवासी वास्तूही आहे जिचा अंशतः जीर्णोद्धार झाला आहे.
प प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे वारंवार वाडीला येणे होत असे. त्यावेळी कवीश्वर पिता पुत्र म्हणजे श्री वक्रतुंड महाराज व श्री धुंडिराजमहाराज त्यांच्या कृपाछत्राखाली आले. श्रीस्वामी महाराज श्री वक्रतुंड महाराजांना त्यांच्या योग्यतेमुळे फार मान देत असत. श्री वक्रतुंड महाराजांचा भारतीय परंपरागत धर्म शास्त्राचा गाढा अभ्यास होता. त्याच्या जोडीला धर्माचरण अत्यंत शुद्ध होते. त्यामुळे श्री स्वामीमहाराजांची कृपा झाली नाही तरच नवल.
त्यांनी वाडीला एकदा एक यज्ञ करायला आरंभ केला. हवनाला साजूक तूप वेळेवर आले नाही तेव्हां मुहूर्ताची वेळ चुकू नये म्हणून त्यांनी श्रीकृष्णामाईला प्रार्थना केली आणि तिचे पवित्र तीर्थ आणून तेच हवनाला तूप म्हणून वापरले. आणि यज्ञ संपन्न झाला. नंतर जेव्हां खरे तूप आले तेव्हां ते त्यांनी श्रीकृष्णामाईला अर्पण केले. श्री नारायण स्वामीच्या पुण्यतिथी उत्सवात व अन्य उत्सवांच्या वेळी देवासमोर ते पुराणसेवा करीत असत. श्रीस्वामीमहाराजांच्या प्रेमकृपेला पात्र ठरल्यामुळे श्री महाराजांचा वाडीत निकटचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. श्रीमहाराजांच्या अंतरंग भक्तांशी म्हणजे प पू श्रीदीक्षित स्वामीमहाराज, प पू श्री गुळवणीमहाराजांशी जवळून संबंध आला आणि तो पुढे वृद्धिंगत झाला.
विदर्भातील देऊगांवराजा येथे श्रीबालाजीमहाराजांचे प्रसिद्ध स्थान आहे. त्या स्थानाची माहिती गोळा करुन पोथीस्वरुपात श्रीबालाजीमहाराजांचे माहात्म्य प्रकाशित केले. संचार करीत ते अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुकातल्या खर्डा या गांवी आले आणि एका मंदिरात राहू लागले. मंदिरात ते सर्व प्रकारची सेवा करीत. त्यांच्या साधी राहाणी, मितभाषी व विनम्र स्वभावामुळे ग्रामस्थांना आरंभाला त्यांची योग्यता समजली नाही. ते श्रीमहाराजांना एक सात्विक ब्राम्हण म्हणूनच ओळखत होते. एकदा त्या मंदिरात श्री भागवत सप्ताह आयोजित केला होता आणि भागवतकथाकार कांही अपरिहार्य कारणामुळे आयत्या वेळी येऊ शकले नाहीत. संयोजकांची पंचाईत झाली. आता करायचे काय अशा संभ्रमात ते पडले असता श्री महाराजांनी विनम्रपणे त्या ग्रामस्थांना श्रीभागवत सप्ताह करण्याची तयारी दाखवली. त्यांनीही ती दिली आणि त्या प्रसंगाने श्रीमहाराजांची विद्वत्ता, ज्ञान, अधिकार सर्वांना समजला.
त्या वेळी एक उल्लेखनीय प्रसंग असा घडला की सप्ताह समाप्तीनंतर प्रथेप्रमाणे श्रीभागवताची मिरवणुक निघाली आणि ती मशिदीवरुन जाताना मुसलमान लोकांनी त्याला आक्षेप घेतला. तेव्हां श्री महाराजांनी त्यांच्या तिथल्या धार्मिक नेत्याला बोलावून असा आक्षेप कसा धर्मबाह्य व चुकीचा आहे हे त्यांच्या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या म्हणजे कुराणाच्याच आधारे पटवून दिले. आणि त्या प्रसंगापासून मुसलमान मंडळीही श्रीमहाराजांना मानू लागली. असे ऐकण्यात आले आहे की श्री दत्तमहाराजांपर्यंत ती परंपरा पुढे चालू होती. श्री दत्तमहाराज खर्डा गांवात मुक्कामाला गेले की एक दिवस मुसलमान मंडळीना दर्शनाला दिला जात असे व ते येऊन श्री महाराजांचा योग्य ती संभावना करीत. एका गणेशचतुर्थीच्या दिवशी त्यांनी आपल्या पत्नीला पूजेतील श्रीगणेशाची मूर्ती त्यांच्या बिछान्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि नामस्मरण करीत देह ठेवला.